हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर: गांजा विक्री मोक्का गुन्हेगारास अटक; तीन किलो गांजा जप्त, थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर कारवाई | Kolhapur News

कोल्हापूर – Kolhapur News | राजारामपुरीसह परिसरात गांजांची खुलेआम तस्करी करणार्‍या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. सनत प्रताप देशपांडे (वय 34, रा. राजारामपुरी 9 वी गल्ली, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून ही विक्री केली जात होती. यावेळी पोलिसांनी 78 हजार रुपये किमतीचा 3 किलो गांजा हस्तगत केला आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनत देशपांडे हा गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा राजारामपुरीतील ११ व्या गल्लीत एका मेडिकलसमोर देशपांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपी त्याच्या साथीदारांसह राजारामपुरी तसेच परिसरात संशयास्पद स्थितीत वावरत होता. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, हवालदार संदीप सावंत यांना संशयित गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे 78 हजार 250 रु. किमतीचा गांजा व मोबाईल, असा 88 हजार 250 रुपयांचा ऐवज आढळून आला.

 ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी गांजा आणल्याची त्याने कबुली दिली. अटकेतील सनत देशपांडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राजारामपुरी आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गांजा विक्रीसह मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कांतर्गत देखील कारवाई झाली होती.

उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्यासह सहायक फौजदार समीर शेख, हवालदार अरविंद पाटील, अंमलदार संदीप सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील, आदींच्या पथकाने कारवाई केली. गांजा विक्रीच्या गुन्ह्यात देशपांडेच्या आणखी काही साथीदारांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker