बातम्या

कोल्हापूर उत्तरला ‘राजेश’च आमदार! पण कोणता राजेश? Kolhapur North Vidhansabha

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील (Kolhapur North Vidhansabha) उमेदवारी बाबतच्या नाट्यमय घडामोडी आता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. कोल्हापूर उत्तर मधून महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच नाव निश्चित झाल्याचे समजत आहे. ते उद्या (सोमवार) आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येतय.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरेत आता राजेश विरूध्द राजेश असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर उत्तर मधून महायुतीच्या उमेदवारीसाठी राजेश क्षीरसागर यांच्यासह कृष्णराज महाडिक आणि सत्यजीत कदम हे देखील भाजपकडून इच्छूक होते. परंतु बऱ्याचशा आरोप प्रत्योरोपातून आणि नाट्यमय घडामोडीनंतर कृष्णराज यांनी उत्तरेतून बाजूला होणं पसंत केलं. तर सत्यजीत कदम मात्र उमेदवारीसाठी शेवटपर्यंत मुंबईत तळ ठोकून असल्याचे दिसत होते. कृष्णराज यांनी माघार घेतल्यानं राजेश क्षीरसागर यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत देखील काँग्रेससोबतच शिवसेना ठाकरे गटानेही याठिकाणी उमेदवारीसाठी दावा सांगितला होता. परंतु हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याने सुरूवातीपासूनच इथे काँग्रेसचा उमेदवार दिला जाईल अशी चर्चा होती. मधुरिमाराजे छत्रपती, विद्यमान आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांच्यासह खुद्द सतेज पाटील यांचे देखील नाव याबाबत आघाडीवर होते. मात्र सतेज पाटील यांनी मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्याला इथे उमेदवारीची संधी देण्यात आली असून राजेश लाटकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

महायुतीकडून इच्छूक असणारे सत्यजीत कदम याबाबत काय भूमिका घेतात तसेच त्यांचे राजकीय पुनवर्सन केले जाते का हे देखील आता औत्सुक्याचे असणार आहे. एकूणच गेली अनेक दिवस कोल्हापूर उत्तर मतदार संघातील उमेदवारीवरून असणारा संघर्ष यामुळे थांबल्याचे दिसत असून आता आमदारकीची माळ कोणत्या राजेशच्या गळ्यात पडणार हे पहावं लागणार आहे.

Back to top button