Kolhapur Water Crisis : सलग दुसर्या दिवशीही कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट
कोल्हापूर | कसबा बावडा जल शुद्धीकरण केंद्रातून नवीन पाण्याच्या टाक्यांना जोडणी तसेच सुभाषनगर पंपिंग स्टेशनजवळच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाई जाणवली. दोन दिवस पाणी न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली. त्यामुळे बुधवारीही अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. सोमवारी महावितरणने पुईखडी सब स्टेशनच्या 33 केव्ही आणि 110 केव्ही मुख्य वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसला. सोमवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने नागरिकांनी पाणी साठवून ठेवल्यामुळे फारशी अडचण जाणवली नाही. मात्र, मंगळवारी पाणीटंचाईची तीव्रता वाढली.
काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या मासिक देखभाल-दुरुस्तीचे काम आणि अमृत 1 योजनेअंतर्गत बावडा फिल्टर पंपहाऊस येथील ग्रॅव्हिटी मेन क्रॉस कनेक्शन व सुभाषनगर पंपिंग स्टेशनच्या रायझिंग मेनलाईन जोडण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे ए, बी, सी, डी, ई वॉर्ड तसेच उपनगरे आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहिला.
महापालिकेने पाणीटंचाई भागांमध्ये 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मंगळवारी 61 फेर्या करून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. कसबा बावडा जल शुद्धीकरण केंद्र आणि कळंबा फिल्टर हाऊस येथून टँकर भरून दिले जात होते. पाणीपुरवठा विभागाला टँकरसाठी मोठ्या प्रमाणावर मागण्या येत होत्या. महापालिकेच्या तीन व खासगी तत्त्वावर भाड्याने घेतलेल्या 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
बुधवारी मध्यरात्रीपासून पाणी उपसा सुरू होणार असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


