Kolhapur Crime : भाचीच्या लग्नात मामाचं धक्कादायक कृत्य; थेट जेवणातच कालवलं विष, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकारानं खळबळ
कोल्हापूर | भाचीने मर्जीविरुद्ध पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून संतापलेल्या मामाने स्वागत समारंभाच्या जेवणात विष कालवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महेश जोतीराम पाटील (रा. उत्रे) या आरोपीविरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात ही घटना घडली आहे.
घटनेचा तपशील
७ जानेवारी रोजी उत्रे येथील गुरुदेव सांस्कृतिक कार्यालयात प्रशांत पाटील यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवरीच्या मामाने, महेश पाटील याने, प्लास्टिकच्या बाटलीतून विषारी औषध थेट जेवणात मिसळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कृत्य जेवण बनवत असलेल्या आचाऱ्याच्या लक्षात आले. आचारी आणि महेश पाटील यांच्यात जोरदार झटापट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अन्नात विषारी औषध मिसळल्याची माहिती हॉलमध्ये समजाच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाली. याप्रकरणी नवरदेव मुलाचे काका संजय पाटील यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अन्नाचे नमुने ताब्यात घेतले असून आरोपीनं नेमकं कोणत्या प्रकारचं औषध अन्नात मिसळं होतं, याची माहिती घेतली जात आहे.
कृत्याचे कारण
महेश पाटीलच्या भाचीने आठवड्याभरापूर्वी गावातील एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केला होता. या विवाहाला महेश याचा तीव्र विरोध होता. भाचीच्या निर्णयामुळे झालेल्या तथाकथित “बदनामी”चा राग मनात धरून त्याने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेकांच्या जिवीताला थेट धोका पोहचवण्याचा प्रयत्न महेश पाटील याने केला.
पोलीस कारवाई
याप्रकरणी महेश जोतीराम पाटील (रा. उत्रे, ता. पन्हाळा) याच्या विरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या महेश पाटील फरार असून, पन्हाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेवणातील विषारी पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने उत्रे गावात एकच खळबळ उडाली आहे. वेळीच आचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. या प्रकरणामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


