Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस पुणे तर एकनाथ शिंदे कोल्हापूरचे दौरे सतत का करतात? काय आहे राजकीय गणित? वाचा…

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे व कोल्हापूरकडे वाढते दौरे सध्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. पुस्तक प्रकाशन समारंभांपासून ते स्थानिक कार्यक्रमांपर्यंत हे दोन्ही नेते सातत्याने उपस्थित राहात असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यांमागील राजकीय गणित काय? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याला विशेष महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आणि रविवारी त्यांनी पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, आणि गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या पुणे दौऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर हा आपला बालेकिल्ला असतानाही, पुण्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद उभारण्याचा फडणवीसांचा प्रयत्न दिसून येतो. पुणे महापालिका भाजपसाठी महत्त्वाची असून, त्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये पाय रोवण्याचे उद्दिष्ट दिसते.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, मराठवाड्यात भाजपचा चांगला जम बसला आहे. अपवाद फक्त पश्चिम महाराष्ट्राचा असून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी वा काँग्रेसमधील नेत्यांची भाजपला पक्ष वाढविण्यासाठी मदत घ्यावी लागली. भाजपची स्वत:ची अशी ताकद अद्यापही निर्माण झालेली नाही. यामुळेच बहुधा फडणवीस यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात अजित पवार हे सुद्धा प्रयत्नशील आहेत. पण पुणे भाजपला व पिंपरी-चिंचवड अजित पवारांना असा तोडगा महायुतीत निघू शकतो, असा महायुतीतच अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोल्हापूरकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना त्यांची सातत्याने उपस्थिती राहते. ठाणे, मुंबई, कोकण या पारंपरिक बालेकिल्ल्यांनंतर कोल्हापूरमध्ये शिवसेनेची पकड वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. २०१४ मध्ये यश मिळवूनही २०१९ मध्ये जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी शिंदे यांचा कोल्हापूर दौऱ्यांवर भर आहे.
राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिंदे गटाने स्वबळावर राज्यात ताकद वाढवण्यासाठी हे नियोजन सुरू केले असल्याचे स्पष्ट दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२९ मध्ये भाजपचे स्वतंत्र सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केल्यानंतर ही रणनीती अधिक ठळक झाली आहे.