पुणे हादरलं! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; स्वारगेट बसस्थानकातील घटनेनं खळबळ | Pune Crime News
पुणे | शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक संतापजनक व धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट परिसरातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत नराधमाने हे अमानुष कृत्य करून पळ काढला. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरी करत होती. ती पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट डेपोमध्ये आली होती. आरोपी दत्तात्रय गाडेने तिला बोलण्यात गुंतवून बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
घटनेच्या वेळी तरुणी जिथे बसलेली होती, तिथे आणखी एक व्यक्ती होती. आरोपी गाडे त्या ठिकाणी आला आणि तरुणीशी संवाद साधू लागला. त्यावेळी त्या ठिकाणी असलेली व्यक्ती निघून गेली. त्यानंतर आरोपीने तरुणीशी ओळख वाढवून तिच्याशी गोड बोलत विश्वास संपादन केला. त्याने तिला सांगितले की फलटणची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली आहे आणि तो तिला तिथे घेऊन जाईल. विश्वास ठेवल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत गेली.
बसजवळ पोहोचल्यावर आरोपीने तिला सांगितले की बस रात्रीची असल्याने लाईट बंद आहेत आणि तिने आत जाऊन टॉर्चने चेक करावे. बसमध्ये चढताच आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिथून पसार झाला. घाबरलेली तरुणी नंतर दुसऱ्या बसने गावी निघाली. तिने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रसंग सांगितला, त्यानंतर मित्राच्या सल्ल्यानुसार ती पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेली.
पोलीस आणि राजकीय प्रतिक्रिया: पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्वारगेट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून विविध पथकांना शोधमोहीमेवर तैनात करण्यात आले आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आरोपीला त्वरित शोधून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “माझ्या शहरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.