हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर | म्हाकवेत आढळला प्राचीन मराठी शिलालेख; १२८८ मध्ये मंदिराचे बांधकाम झाल्याचे स्पष्ट | Inscription found in Mhakve

कोल्हापूर | म्हाकवे (ता. कागल) येथील गावडुबाई मंदिरात तब्बल १३व्या शतकातील शिलालेख (Inscription found in Mhakve) आढळून आला आहे. शिलालेखाचा शोध सोनगे, कागल येथील शिवकालीन शस्त्र व नाणी अभ्यासक अमरसिंह पाटील यांनी लावला असून, पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी त्याचे वाचन केले आहे.

हा शिलालेख उत्तर भारतीय वळणाच्या नागरी लिपीत कोरलेला असून त्यातील भाषा जुनी मराठी आहे. या शिलालेखात गुरु रवलदेव यांचा शिष्य रत्नध्वज याने मंदिर बांधल्याचा उल्लेख असून, त्याच्या गुरूभक्तीचेही दर्शन यात होते. तसेच, शिळेवर सवत्स गाय, तलवार, सूर्य, चंद्र आणि शिवलिंग अशी कोरीव चिन्हे आढळतात, जी दक्षिण भारतातील अनेक कोरीव लेखांमध्ये आढळून येतात.

शिलालेखाचा कालावधी इ.स. १२८८ असल्याचे समजते. त्या काळात देवगिरीच्या यादव राजवटीचा प्रभाव होता आणि यादव राजा रामचंद्रदेव सत्तेवर होता. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी शिलालेखांची संख्या यादवांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढत गेली होती. त्यामुळे मराठीला मिळालेली राजमान्यता आणि तिचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते.

१९९९ साली गावडुबाई मंदिर परिसरात डी.आर. माने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर झाले होते. त्यावेळी स्वच्छता करताना विद्यार्थ्यांना मंदिराच्या पायथ्याशी हा शिलालेख सापडला. त्यानंतर तो मंदिराजवळ ठेवण्यात आला, मात्र त्याचे संपूर्ण वाचन होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी म्हाकवे येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अमरसिंह पाटील यांनी अमित पाटील आणि विजय पाटील यांच्या मदतीने या शिलालेखाच्या वाचनासाठी प्रयत्न सुरू झाले आणि अखेर त्याला यश मिळाले.

अमरसिंह पाटील म्हणाले, “इतिहासातील प्राचीन शस्त्रांचा अभ्यास करताना अनेक गावांमध्ये असा वारसा पाहायला मिळतो. मात्र, माझ्या जवळच्या गावाचा इतिहास मी सांगू शकत नव्हतो. हा शिलालेख सापडल्यामुळे म्हाकवे गाव यादवकाळापासून अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होत असून ऐतिहासिकदृष्ट्या तो महत्त्वाचा ठरत आहे. याचा मोठा आनंद आहे.”

या ऐतिहासिक शोधामुळे म्हाकवे गावाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा शोध मोलाचा ठरत आहे.

Back to top button