बातम्याहॅलो कोल्हापूर

फरार मटकाबुकी सम्राट कोराणे अखेर 6 वर्षांनी कोर्टात शरण | Samrat Korane

कोल्हापूर | महाराष्ट्र गुन्हेगारी संघटित नियंत्रण कायदा (मोकां) अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी गेली अनेक वर्षे फरार असलेला मटकाबुकी सम्राट सुभाष कोराणे (वय 41, रा. वेताळमाळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) अखेर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात शरण आला आहे. बुधवारी (दि. 5) न्यायालयात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये नेले व त्यानंतर कळंबा कारागृहात रवानगी केली.

2019 पासून फरार असलेला कोराणे (Samrat Korane) अखेर हाती
एप्रिल 2019 मध्ये कोल्हापूर पोलिसांनी मटकामालकांवर ‘मोकां’ अंतर्गत मोठी कारवाई केली होती. यामध्ये राज्यभरातील 44 आरोपींचा समावेश होता. यातील 42 जणांना अटक झाली, मात्र सुभाष कोराणे फरार होता. त्याने कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईविरोधात विशेष ‘मोका’ न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्व न्यायालयांनी त्याची याचिका फेटाळली. त्यामुळे शरण जाण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. याच प्रकरणातील मुंबईतील फरारी आरोपी प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलिसांवर हल्ला आणि मोठा वाद
8 एप्रिल 2019 रोजी प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने यादवनगर येथे सलीम मुल्ला याच्या मटकाअड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यभर खळबळ माजली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास झाला. विशेष ‘मोका’ न्यायालयात 44 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका
कोराणे आणि प्रकाश सावला यांनी पोलिस कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने 19 सप्टेंबर 2020 रोजी “आधी पोलिसांना शरण जा, त्यानंतरच याचिकेवर विचार होईल,” असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे शेवटी कोराणे याने आत्मसमर्पण केले.

पोलिसांवरील हल्ल्यात अनर्थ टळला
2019 मध्ये पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांनी पोलिसांची 9 एमएम सर्व्हिस पिस्टल लंपास केली होती. या पिस्टलमध्ये 5 जिवंत काडतुसे होती. पोलिसांना ती घटनास्थळीच परत मिळाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

44 जणांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई
या प्रकरणात कोल्हापूर आणि मुंबईतील 44 जणांवर ‘मोकां’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये माजी नगरसेविका शमा सलीम मुल्ला, तौफीक शिकलगार, सज्जाद नाईकवडी, दिलीप कवडे, फिरोज मुजावर, विजय सांगावकर, आरिफ शेख, आकाश पोवार, जमीर मुजावर, शाहरूख लाड यांसह इतर अनेक आरोपींचा समावेश होता. यातील 42 आरोपींना अटक झाली असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर जामिनावर बाहेर आहेत.

सुभाष कोराणे याच्या अटकेने पोलिसांना महत्त्वाचा यश मिळाले असून, आता फरार प्रकाश सावला याच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker