खासदार मानेंचा प्रचार करणार नाही; भाजपच्या संजय पाटलांची भूमिका! Hatkanangale Loksabha Election 2024
Hatkanangale Loksabha Election 2024: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आवाडे गट आणि संजय पाटील गट नाराज आहेत. यंदाच्या लोकसभेला हातकणंगले मतदार संघातुन राहुल आवाडे आणि संजय पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली असली, तरी नेत्यांमधील नाराजी दूर करण्यात मात्र त्यांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. माने यांना अंतर्गत विरोध होत असतानाच भाजपमधील नेत्यांचा सुद्धा कडाडून विरोध होत आहे. मतदारसंघातून गायब झाल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका होत असतानाच आता भाजप नेत्यांच्या नाराजीला सुद्धा त्यांना सामोरे जाव लागत आहे.
राहुल आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्याविरोधात थेट लोकसभा लढविण्याचा निर्धार केला आहे. तर भाजप नेते संजय पाटील यांनी सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. संजय पाटील स्वतः हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ शिंदेंकडे राहिल्याने उमेदवारी पुन्हा एकदा माने यांना मिळाली आहे.
संजय पाटील म्हणाले की, धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये निगेटिव्हिटी आहे. एक खासदार कमी होऊ शकतो, याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच मतदारसंघांमधील नेत्यांना कल्पना दिली असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, माझे सर्व पक्षातील नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे.


