बातम्या

‘हे’ तर मोदींचा करिष्मा संपल्याचे प्रतिक..! Loksabha Election 2024

Loksabha Election 2024: राज्यात महायुतीमध्ये महावाद सुरु आहेत. खरं तर आपण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूका पाहिलेल्या आहेत. या दोन्ही लोकसभेच्या निवडणूकीत मोदी-शहांकडून जो उमेदवार दिला जात असे त्या उमेदवाराच्या प्रचाराचे काम घटकपक्ष व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने करताना दिसत होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकांत असे चित्र अजिबात नाही. उदाहरणादाखल आपण खालील ८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ…

१) रावेरः रावेर मधून भाजपाने खासदार रक्षा खडसे यांनाच परत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिलेला नाही. मतदारसंघातील जनसंपर्काकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम त्यांच्याविरोधात नाराजी उफाळून आली आहे. रक्षा खडसे यांचा पराभव समोर दिसू लागताच भाजपाने सासरे एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घेण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.

२) हिंगोलीः हिंगोली मधून शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांचाही हेमंत पाटील यांना तीव्र विरोध सुरु झाला. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उमेदवार बदलला नाही तर भाजपवाले हा उमेदवार पराभूत करणार आहेत. तर उमेदवारी भाजपला दिल्यास शिंदे गट भाजपाच्या विरोधात मतदान करणार आहे. अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे.

३) बुलढाणाः बुलढाण्यातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांनी आज आपली उमेदवारी दाखल केली. पण त्यांना शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा कडवा विरोध असून त्यांनी अपक्ष उमेदवारी घोषित करत उमेदवारी अर्जही खरेदी केला आहे. शिंदेसेनेच्या या गोंधळात उमेदवार पराभूत होण्याची भिती असल्याने भाजपाचे निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी काल उमेदवारी दाखल केली आहे.

४) यवतमाळः मोदींना राखी बांधणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात जनतेत संतापाची लाट असल्याने त्यांची उमेदवारी कापण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेना दिले आहेत. या मतदारसंघातून संजय राठोडांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे ३ दिवस उरलेत तरी उमेदवारी निश्चिती झालेली नाही. एकूणच राठोड किंवा गवळी दोघांचीही उमेदवारी धोक्यात आहे.

५) हातकणंगलेः शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस भाजपाचा तीव्र विरोध आहे. उमेदवार न बदलल्यास पराभूत करण्याचा इशारा भाजपा व महायुतीच्या घटक पक्षांनी दिल्याने उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ऐनवेळी उमेदवार बदलला तर धैर्यशील माने नाराज तर उमेदवार न बदलल्यास जागा पराभूत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

६) माढाः माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या समर्थकांनी यापूर्वीच बंड केले होते. धैर्यशील मोहीते पाटील यांची नाराजी काढण्यात काही अंशी भाजपाला यश आले. मात्र निंबाळकरांनी मोहिते-पाटलांच्या विरोधात मोहीम उघडल्याने धैर्यशील मोहिते पाटील हाती तुतारी घेण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहीते-पाटील यांना भाजपाने रोखल्यास प्रवीणदादा गायकवाड तुतारी चिन्हावर तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील.

७) साताराः सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला लढायचा नाही म्हणून अजित पवारांना सोडला आहे. मात्र याठिकाणी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा पवित्रा घेतला आहे. भाजप त्यांच्यापुढे हतबल असल्याने त्यांनी उदयनराजेंना तूर्तास शब्द दिला आहे. मात्र अजित पवार हे उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढावे म्हणून आग्रही आहेत. तर उदयनराजे मात्र अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्यास अजिबात राजी नाहीत. याउलट साताऱ्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा पर्याय शरद पवारांकडे असल्याने या मतदारसंघात महायुतीचा पराभव जवळपास निश्चित आहे.

८) परभणीः परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव हे शिवसेना उध्दव ठाकरे गटात आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार द्यावा म्हणून हा मतदारसंघ अजित पवारांना सोडला आहे. मात्र अजित पवारांनी बारामतीत जानकरांची मदत घेण्यासाठी परभणी मतदारसंघातून जानकरांना उमेदवारी दिली. जानकरांचा स्वतःचा रासप हा पक्ष असताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी घेतली. मात्र जानकरांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक न लढवता शिट्टी, सफरचंद, रोडरोलर चिन्हांची मागणी केली आहे.

वरील ८ लोकसभा मतदारसंघातील चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की, मोदी नावाची आणि कमळ चिन्हाची लोकप्रियता सपशेल ढासळली आहे. मोदींच्या आदेशाला कोलदांडा देवून महायुतीत महाकुस्ती सुरु आहे. हे चित्र तुम्हाला कोणत्याही न्यूज चॅनेलवर पहायला वा वृत्तपत्रात वाचायला मिळणार नाही. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी आणि जागरूक नागरिकांनीच अशा पोस्ट लोकांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहचवणे गरजेचे आहे.

– तुषार गायकवाड

Source
तुषार गायकवाड
Back to top button