अरूण डोंगळेची तलवार म्यान, राजीनामा देण्याची तयारी! Arun Dongle
If the new president of Gokul is from the Mahayuti, then Arun Dongle will resign and he will meet Fadnavis Shinde in Mumbai on Tuesday.
कोल्हापूर | गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवताच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. मात्र गोकुळमधील (Gokul Milk) नेत्यांनी त्यांच्या बंडाला चोख प्रत्युत्तर देत डोंगळेंना राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्यात यश संपादन केलं. डोंगळे यांच्या जागी आता महायुतीचा अध्यक्ष बसवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असून, याच पार्श्वभूमीवर डोंगळे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगळे यांनी या नेत्यांना भेटून स्पष्टपणे सांगण्याचा निर्णय घेतला आहे की, महायुतीचा अध्यक्ष होत असल्याने आपली मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून करणार आहेत. ही भेट मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन वर्षांची मुदत पूर्ण; पण हटवण्यासाठी लागणार अविश्वास ठराव
गोकुळमध्ये अध्यक्षपदाची दोन वर्षांची मुदत पूर्ण झाल्याने 15 मे रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत डोंगळे राजीनामा देतील, अशी अटकळ होती. मात्र त्यांनी थेट मुंबई गाठून “राजीनामा फक्त मोठ्या नेत्यांच्या आदेशानेच देऊ,” अशी भूमिका घेत सर्वांनाच अडचणीत टाकलं.
डोंगळे एकाकी; 21 पैकी 18 संचालक नेत्यांच्या बाजूने
डोंगळे यांच्या बंडाने गोकुळचे नेते अस्वस्थ झाले तरी या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी बैठका घेऊन सहकारात पक्ष नसतो, अशी भूमिका मांडली. त्यानंतर गोकुळमधील सत्तांतरात सहभागी सर्व घटक पक्षांनी एकजुटीने डोंगळेंना अलगदपणे एकटे पाडले. 21 संचालकांपैकी तब्बल 18 संचालक थेट गटनेत्यांच्या पाठीशी राहिल्याने डोंगळे बॅकफूटवर गेले. अविश्वास ठरावाशिवाय त्यांना हटवणे शक्य नसल्याने नेत्यांनी रणनीतीनुसार त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढवला.
डोंगळे हे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी सक्रिय राहिले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबीटकर (Prakash Abitkar) आणि आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narake) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातदेखील महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं समजतं. त्यावेळी स्थानिक दूध संघाच्या राजकारणात जिल्हा पातळीवरच्या नेत्यांना निर्णय घेऊ द्यावा, अशी विनंती पवार यांनी फडणवीस यांना केल्याचे समजते.
अरुण, तिकडं कुठं गेलास? माझ्याकडे यायचं होतं ना?
गवसे येथील एका विवाह सोहळ्यात गोकुळचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि अरुण डोंगळे यांची समोरासमोर भेट झाली. डोंगळेंनी आदराने नमस्कार केल्यावर मुश्रीफ यांनी थेट प्रश्न टाकला – “अरुण, तिकडं कुठं गेलास? माझ्याकडे यायचं होतं ना? मुंबईला जायची काय गरज होती?” यावर दोघांत काही काळ चर्चा झाली. चर्चेत महायुतीच्या (Mahayuti) घटक पक्षाचाच अध्यक्ष होईल असे मुश्रीफ यांनी सांगितल्याने डोंगळे यांनी महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तर आपण मंगळवारी मुंबईत नेत्यांना भेटून राजीनाम्याची परवानगी मागू, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारी डोंगळे मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटून काय निर्णय घेतात हे आता पहावं लागणार आहे.