बातम्या

जनसुराज्यचे हातकणंगले, करवीर & शाहूवाडी विधानसभेसाठी उमेदवार जाहीर, वाचा सविस्तर…

कोल्हापूर | विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यचे देखील उमेदवार जाहीर झाले आहेत. जनसुराज्यला महायुतीच्या जागावाटपात दोन जागा मिळाल्या आहेत. तर तिसरा उमेदवार हा मैत्रीपूर्ण लढतीसाठी उभा केला जाणार आहे.

जनसुराज्यला हातकणंगले, शाहूवाडी याठिकाणच्या जागा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये हातकणंगलेतून दलितमित्र अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शाहूवाडी पन्हाळा मतदार संघातून स्वतः विनय कोरे रिंगणात उतरतील. त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदार संघात संताजी घोरपडे यांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

करवीर मतदार संघातील लढत ही मैत्रीपूर्ण असणार आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीच संताजी घोरपडे यांची उमेदवारी जनसुराज्यकडून जाहीर करण्यात आली होती. करवीर मतदार संघात महायुतीच्या वतीने माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून ते विधानसभा लढणार आहेत.

संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार असल्याचे सांगितले जात आहे. करवीर मतदार संघात कोरे गटाची मते नरके गटाला कधीच मिळत नाहीत. त्यामुळं कोरे गटाची मतं महाविकास आघाडीच्या राहुल पाटील यांच्याकडे वळू नयेत यासाठी ही खेळी करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे करवीर मतदार संघातील जनसुराज्यची उमेदवारी ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जनसुराज्यच्या संताजी घोरपडेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत कोरे आणि जनसुराज्यच्या इतर पदाधिकाऱ्यांची मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक देखील झाली आहे. या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker