जोतिबाच्या नावानं चांगभलं! आजपासून खेटे सुरू, खेटे म्हणजे काय? काय आहे परंपरा? Jyotiba Khete 2025
कोल्हापूर आणि जोतिबाचे खेटे ही पूर्वापर चालत आलेली परंपरा आहे. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा देवाचे खेटे सुरू होतात.
कोल्हापूर | जोतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या खेट्यांना (Jyotiba Khete 2025) आज, 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. यासाठी जोतिबा नगरी वाडी रत्नागिरी सज्ज झाली असून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील डागडुजी पूर्ण केली आहे. ग्रामपंचायतीनेही स्वच्छता आणि मुबलक पाण्याची व्यवस्था केली आहे. या खेट्यांसाठी राज्यासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावतात.
जोतिबा देवाचे पारंपरिक खेटे आणि धार्मिक विधी – Jyotiba Khete 2025
माघ महिन्यात जोतिबा देवाचे पाच खेटे घातले जातात. पहाटे 4 वाजल्यापासून या खेट्यांना सुरुवात होते. कोल्हापूरातील पंचगंगा नदी काठी आंघोळ करून भाविक जोतिबाच्या नावाने चांगभलचा जयघोष करत डोंगराच्या दिशेने मार्गस्थ होतात. डोंगराच्या वाटांवर गर्दीचे वातावरण निर्माण होते आणि संपूर्ण परिसर भक्तीमय होतो.
जोतिबाचे खेटे म्हणजे काय?
जोतिबा डोंगरावर चार रविवारी भरणाऱ्या यात्रेला ‘जोतिबाचे खेटे’ असे म्हणतात. या दिवशी भाविक अनवाणी पायाने डोंगर चढण्याची परंपरा आहे. विशेषतः महिलांचा मोठा सहभाग असतो. सांगली, सातारा आणि अन्य भागांतील भाविक गायमुख ते जोतिबा या दगडी पायरी मार्गावरून आपले खेटे पूर्ण करतात.
जोतिबाच्या खेट्यांची ऐतिहासिक परंपरा
माघ पौर्णिमेनंतर प्रत्येक रविवारी भरणाऱ्या यात्रेला खेटे म्हटले जाते. आख्यायिकेनुसार, केदारनाथ दक्षिण मोहिम संपवून हिमालयाकडे निघाले असता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने त्यांना विनवणी केली. त्यानुसार, केदारनाथ वाडी रत्नागिरी डोंगरावर स्थायिक झाले. तेव्हापासून भाविकांनी अनवाणी पायाने डोंगर चढण्याची परंपरा सुरू झाली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे भाविकांना आवाहन
भाविक पहाटेपासूनच डोंगर चढून दर्शनासाठी येतात. परंपरा जपत काहीजण पायी तर काही वाहनानेही येतात. देवस्थान समितीने भाविकांना कोणतेही गैरवर्तन न करण्याचे आणि डोंगर परिसरात आगी लावू नये, असे आवाहन केले आहे.