कोल्हापुरातील मटका बुकी सम्राट कोराणेच्या दोन साथीदारांना अटक | Samrat Korane
कोल्हापूर | कोल्हापुरातील मटका बुकी सम्राट कोराणे (Samrat Korane) याला आश्रय आणि आर्थिक मदत करणाऱ्या दोन साथीदारांना विशेष पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील संशयितांची संख्या आता 46 झाली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विजय उर्फ सोन्या कोराणे (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि उत्तम मोरे (रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. सोन्या कोराणे हा सम्राट कोराणेचा पुतण्या असून, त्याने फरारी काळात त्याला आर्थिक मदत पुरवली होती. तर उत्तम मोरे याने वाशी येथे भाड्याचा फ्लॅट मिळवून देण्यास मदत केली होती. चौकशीत ही माहिती निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी त्यांना अटक केली.
तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने सम्राट कोराणेसह 44 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली होती. कोराणे वगळता 42 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, कोराणे सहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर काही दिवसांपूर्वी तो जिल्हा न्यायालयात हजर झाला. त्याला 7 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले होते.