बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरात अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर छापा; 16 गॅस सिलेंडरसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त | Raid on illegal gas refilling station

कोल्हापूर | कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौक परिसरात असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून 16 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि एचपी मोटर असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सिद्धिविनायक गणपती मंदिरालगत असलेल्या महादेव शिंदे यांच्या आनंद ऑटो गॅरेज येथे करण्यात आली. यापूर्वीही 2024 मध्ये याच ठिकाणी कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता. मंदिर परिसर गर्दीचा असून अशा प्रकारच्या धोकादायक ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.

जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या निर्देशानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा निरीक्षक महेश काटकर आणि भाऊसाहेब खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुन्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरवठा विभागाच्या कार्याचे कौतुक करत अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन्सवर सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button