नोकरी

खुशखबर! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२२३ नवीन पदांच्या आकृतिबंधाला मान्यता, लवकरच नवीन पदभरती | Maharashtra Excise Department Bharti 2025

Maharashtra Excise Department Bharti 2025: राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल भरणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर सरकारने मनुष्यबळाची ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. विभागातील वाढती कामाची गरज लक्षात घेता, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२२३ नवीन पदांच्या आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली. यामध्ये ७४४ नवीन पदे तर ४७९ पर्यवेक्षीय स्वरूपाच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विभागात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षक, लिपिक, जवान, वाहनचालक, टंकलेखक, लेखापाल आणि इतर विविध पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे नियमित तपासणी आणि कारवाई करताना विभागाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्मितीवर नियंत्रण ठेवले जाते. त्याचबरोबर अवैध मद्यवाहतूक, साठा आणि विक्रीवरही कडक नजर ठेवली जाते. या कामकाजातून दरवर्षी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा महसूल फक्त नाशिक विभागामार्फत राज्याच्या तिजोरीत जमा होतो.

विभागाच्या या उत्पन्नक्षमतेचा विचार करता, त्याला आवश्यक ती मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे होते. मात्र अनेक पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाला अडचणी येत होत्या. आता नवीन पदांना मंजुरी मिळाल्यानंतर विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि अवैध व्यवसायांवर अधिक प्रभावी कारवाई करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार असून, येत्या काळात भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी तयारी सुरू ठेवावी, असा सल्ला संबंधित अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker