नराधम दत्ता गाडेनं त्या रात्री अज्ञात महिलेची काढली होती छेड; तर आणखी एका महिलेवर केला होता बलात्काराचा प्रयत्न | Pune Rape Case
Pune Rape Case: स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला अखेर ७५ तासांनंतर अटक केली. सध्या त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्या रात्री दुसऱ्या महिलेलाही केली होती छेडछाड
अशातच दत्ता गाडे संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या त्या रात्रीच त्याने आणखी एका अज्ञात महिलेला छेडले होते. त्यानंतर त्याने पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
बलात्कारापूर्वी ओळखीच्या महिलेला केले होते सहा फोन
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अत्याचाराच्या घटनेपूर्वी दत्ता गाडेने ओळखीच्या एका महिलेला सहा वेळा फोन केला होता. त्याने तिला पोलिस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, त्या महिलेने त्याच्यासोबत येण्यास नकार दिल्याने गाडेने फलटणला जाणाऱ्या तरुणीशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी स्वारगेट बस डेपोत बसच्या प्रतीक्षेत होती. त्याचवेळी दत्ता गाडेने तिच्यासोबत संवाद साधत मी कंडक्टर असल्याचे सांगून तिला बसमध्ये नेऊन अतिप्रसंग केला.
गाडेने जबरदस्तीने बसमध्ये नेले आणि अत्याचार केला
पीडितेच्या जबाबानुसार, दत्ता गाडेने तिला बस कंडक्टर असल्याचे सांगून आपल्या सोबत नेले. बसमध्ये प्रवेश करताच त्याने मुख्य दरवाजा आणि चालकाच्या केबिनमधील दरवाजा बंद केला. बसमध्ये कोणीही नसल्याचे पाहून पीडितेने बाहेर सोडण्याची विनवणी केली. मात्र, आरोपीने तिला जबरदस्तीने सीटवर ढकलले आणि तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचा गळा दाबून तिला धमकावले. जीव वाचवण्यासाठी तिने त्याला विनवणी केली. “दादा, काय करायचं आहे ते कर, पण मला जीवे मारू नको,”.
यापूर्वीही एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न
यापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार दाखल केली होती.
आरोपीच्या आर्थिक स्थितीवर संशय
न्यायालयात आरोपीच्या वकिलाने संगनमताचा आरोप करत, त्याने काही रक्कम दिल्याचे सांगितले. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या बँक खात्यात महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याचे आढळले. त्यामुळे, आरोपीने पैशांची देवाणघेवाण कशी केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास अधिकाऱ्यांनी दोघांच्या मोबाइलचे मागील दोन वर्षांचे कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) तपासले असता, आरोपी आणि पीडितेचा पूर्वी कोणताही संपर्क नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.
मित्राने आणि बहिणीने तक्रार नोंदवण्याचा दिला सल्ला
घटनेनंतर पीडितेने त्वरित आपल्या मित्राला आणि बहिणीला फोन करून झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार, तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
स्वारगेट बसस्थानकात महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
या धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळाने स्वारगेट बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी नवे उपाय योजण्याचे ठरवले आहे. यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार असून, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सुरक्षा लेखापरीक्षणानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.


