बातम्या

सांगली: विशाल पाटलांची वाट खडतर.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘या’ निर्णयाने धक्का | Vishal Patil Sangli Loksabha

सांगली | सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना आणखी एक धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेमुळे हा धक्का बसला आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana)  राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना (Mahesh Kharad) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशाल पाटील यांनी 2019 ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच स्वतःचा उमेदवार जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास 500 किमी पदयात्रा काढली. 20 ते 22 दिवस ही पदयात्रा सुरू होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकवलेली ऊसबिले ती शेतकऱ्यांना आंदोलन करून मिळवून दिली होती.

बेदाण्यांचा प्रश्न मार्गी लावला. बेदाणा जो उधळला जातो किंवा पैसा बुडवला जातो त्याविरोधात आवाज उठवला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून खराडे यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. म्हणूनच आम्ही शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवून जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. 

शेतकरी संघटनेचा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला पक्षांपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्‍वाचे आहेत. महायुती असो अथवा महाआघाडी ज्या ज्या वेळी या पक्षांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कोणताही विचार न करता आम्ही बाहेर पडलो. 

स्वाभिमानीची मदत विशाल पाटील यांना मिळणार नाही

सांगलीत अपक्ष उभे राहिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकद आपल्या मदतीला येईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना जवळपास साडेतीन लाख मते मिळाली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच सांगली जिल्हाध्यक्षांची उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिल्यास मिळणार नाही. आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही निवडणूक ‘एक व्होट एक नोट’ या तत्त्वावर लढवली जाणार असल्याचे शेट्टीने जाहीर केले आहे.

Back to top button