हॅलो कोल्हापूर

कळंबा कारागृहात कैद्यांकडे सापडले 50 हून अधिक मोबाइल; क्लीन स्वीप मोहिमेद्वारे शोध | Kolhapur Kalamba Jail News

कोल्हापूर | कळंबा मध्यवर्ती कारागृहांची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येत आहे. असे असले तरी क्लीन स्वीप मोहिमेत कारागृहाची झडती घेताना 50 हून अधिक मोबाइल सापडल्याने प्रशासनही चक्रावून गेले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी तटबंदीची उंची 24 फूट करण्यात येणार आहे. त्यासह अवैधरीत्या मोबाइल वापरण्याची सवय संपविण्यासाठी कैद्यांना ॲलन स्मार्ट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाचा कार्यभार शामकांत चंद्रकांत शेडगे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने क्लीन स्वीप मोहिमेची सुरुवात केली आहे. सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 2220 कैदी आहेत. कारागृहाची क्षमता 1699 इतकी आहे. कारागृहात तंबाखूच्या 13 पुड्यांमध्ये 214 ग्रॅम गांजा सापडल्यानंतर आता कैद्यांकडे 50 मोबाइल सापडल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. संबंधित कैद्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. सध्या कारागृहाच्या तटबंदीची उंची 18 फूट आहे. ती 6 फुटांनी आणखी वाढविली जात आहे. या सहा फुटांत मोठी जाळी बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. कैद्यांना मदत करणाऱ्यांना वाढीव उंचीवरून मोबाइल, पुड्या फेकता येणार नाहीत. त्यातूनही साहित्य फेकले तर ते बरॅकच्या ऐवजी अंतर्गत रस्त्यावर पडेल, अशी काळजी घेतली जाणार आहे.

आठवड्यातून तीन दिवस बोलण्याची संधी

स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या कैद्यांच्या फोन नंबरची पडताळणी पोलिसांकडून झाली आहे, त्यांनाच ॲलन स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटांच्या कालावधी करिता कैद्यांना या फोनवरून बोलता येणार आहे. 

अपर पोलिस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवाचे अमिताभ गुप्ता, कारागृह डीआयजी स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच कारागृहातील गैरप्रकाराला आळा बसेल. – शामकांत शेडगे, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा