Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

छत्रपती शाहू महाराजांच्या ‘घसरगुंडी’ मागची ‘ही’ आहे सत्यकथा!

राजर्षी शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे अधिपती नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक न्याय चळवळीचे अग्रणी शिल्पकार होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी, आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं.

मात्र त्यांच्या काळातच काही सनातनी विरोधकांनी त्यांच्या बदनामीसाठी अनेक अफवा पसरवल्या. त्यापैकीच एक म्हणजे – शाहू महाराजांनी सोनतळी कॅम्प परिसरात महिलांसोबत दूराचार करण्यासाठी एक “घसरगुंडी” उभारली होती, अशी घृणास्पद आणि निराधार कथा.

शाहू महाराज आणि ‘घसरगुंडी’ – काय आहे सत्य?

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर, सोनतळी गावाजवळ एक बंगला आहे – स्काऊट बंगला. याठिकाणी शाहू महाराज आठवड्यातून काही दिवस मुक्काम करत असत. याच बंगल्याच्या आवारात एक २० फूट उंच व ४ फूट रुंद भरीव दगडी घसरगुंडी आहे. दोन्ही बाजूंना लोखंडी रॉड असून, ही घसरगुंडी लहान मुलांच्या खेळण्यासारखी नसून उंच व भरीव दगडी बांधकामाची आहे. जीचा वापर महाराज त्यांच्या वैयक्तिक व्यायामासाठी करत असतं.

हिंदूराव साळुंखे यांच्या ‘शाहू महाराज स्मृतीदर्शन’ या पुस्तकात या घसरगुंडी बाबतचे सविस्तर वर्णन आहे. हिंदुराव साळुंखे यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याकाळी महाराजांच्या सेवेत असणाऱ्या एका वयोवृद्ध सेवकाकडून याबाबतची माहिती जाणून घेतली होती. हा वयोवृध्द सेवक सांगतो की:

“महाराजांची उंची सुमारे ६ फूट ४ इंच होती आणि त्यांचे वजन सतत वाढत चालले होते. डॉक्टरांनी त्यांना वजन कमी केले नाही तर प्रकृतीस धोका आहे असे सांगितले होते. त्यानुसार महाराजांनी हरतऱ्हेचे व्यायाम सुरू केले होते. ही घसरगुंडी म्हणजे त्याचाच एक भाग. महाराज घसरगुंडीच्या एका बाजूने लोखंडी रॉडला धरून वर चढत, वर थोडा वेळ थांबत, आणि दुसऱ्या बाजूने गुळगुळीत उतारावरून घसरून खाली येत.

प्रत्येक वेळी थोडा थोडा वेग वाढवीत. अंगात सदरा व खाली लुंगी असे. घामाने सदरा चिंब भिजल्यानंतर दूसऱ्या बाजूने उतरताना बसून घसरत खाली येत, हा व्यायाम अंगातील घामाच्या धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यंत चाले. खाली एक हुजऱ्या एक टॉवेल आणि दूसरे कपडे घेवून सज्ज असे. म्हणजेच घसरगुंडी ही शाहू महाराजांनी वैयक्तिक व्यायामासाठी करुन घेतली होती, हे स्पष्ट आहे. आणि हा त्यांच्या शिस्तबद्ध व्यायामाचा प्रकार होता.”

मग बदनामी कुणी केली? आणि का केली?

शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सनातनी ब्राह्मणशाहीला खुले आव्हान दिले. वेदोक्त प्रकरण, टिळकांशी झालेल्या वैचारिक संघर्ष, कुलकर्णी वतनाची खालसा, दलितांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण, शिक्षणात संधी, हे सर्व मुद्दे त्यांनी अत्यंत धैर्याने हाताळले.

यामुळे नाराज झालेले काही सनातनी मंडळींनी, विशेषतः ब्राह्मणवर्चस्ववादी गटांनी, त्यांच्या चारित्र्यावर खोटे आरोप लावून त्यांची बदनामी करण्याचा विडाच उचलला. या मागे वैयक्तिक सूड, जातीय अहंकार आणि प्रगतीला विरोध अशी अनेक कारणे होती.

शाहूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी इतिहासातील दोन गंभीर षड्यंत्रे

१९०१ – जिरगे प्रकरण

  • कोल्हापुरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीबाबत राजवाड्यात चुकीचे आरोप करण्यात आले.
  • या प्रकरणात संबंधित पित्याने आत्महत्या केली.
  • शाहू महाराज त्या वेळी कोल्हापुरात नसून सोनतळी कॅम्पवर होते.
  • इंग्रज सरकारने चौकशी केली आणि आरोप पूर्णपणे निराधार ठरले.

संदर्भ:

  • ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ – जयसिंगराव पवार, पृ. २४२
  • ‘राजर्षी शाहू: राजा व माणूस’ – कृ.गो. सूर्यवंशी, पृ. ३५९-३६०
  • ‘Shahu Chhatrapati – A Royal Revolutionary’ – Dhananjay Keer, पृ. १६२

१९०६ – निनावी पत्रांचा डाव

  • ‘शाहू महाराजांनी तीन स्त्रियांवर अन्याय केला’ अशा आशयाची पत्रे मुंबई सरकारला पाठवण्यात आली.
  • कलकत्त्याच्या लेडी मिंटो यांच्याकडेही एक अर्ज धाडण्यात आला.
  • लेडी मिंटो यांची सहानुभूती मिळवून शाहूंना पदच्युत करण्याचा डाव होता.
  • महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्वतः चौकशीची मागणी केली.
  • इंग्रजांनी गुप्त चौकशी केली आणि महाराज निष्कलंक असल्याचे स्पष्ट केले. अहवाल मुंबई, व्हाईसरॉय व इंग्लंडला पाठवण्यात आला.

‘घसरगुंडी’चा विनोद – मनाला लागणारा अपमान

शाहू महाराजां बद्दल आज ठिकठिकाणी “शाहू महाराजांची घसरगुंडी” ह्या शब्द प्रयोगाने विकृत आणि कंबरे खालचे विनोद सगळीकडे कुजबुजले जातात. त्या त्या प्रदेशानुसार, व्यक्ती नुसार त्या विकृत विनोदाचे स्वरूप वेगवेगळे असले तरी सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे बहुजन मराठा समाजातील तरुण मंडळीही त्यात सामील होताना दिसतात – हे अत्यंत क्लेशदायक आहे.

हा केवळ शाहू महाराजांचा अपमान नाही, तर संपूर्ण बहुजन-मराठा समाजाचा, आपल्या इतिहासाचा, आपल्या परंपरेचा अपमान आहे. हेच विकृत विनोद छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊसाहेब, शहाजी राजे यांच्याबाबतही ऐकायला मिळतात. परंतु इतकं सगळं होऊनही आपलं रक्त सळसळत नाही. हेही त्याहून मोठं दुर्दैव!

वैचारिक लढ्याची गरज

शाहू महाराजांचे चरित्र सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, तेजस्वी, आणि शुद्ध होते. पण त्यांच्यावर अनेकदा चिखलफेक झाली. तेव्हा ते चिडले नाहीत, उलट सत्याच्या मार्गावर ठाम राहिले. त्यामुळे शाहू महाराजांप्रमाणेच अशा सर्व महापुरूषांच्या बदनामीच्या षड्यंत्राला उत्तर देताना आपल्यालाही भावनांपेक्षा विचारांची आणि पुराव्यांची लढाई लढावी लागेल.

शाहूंवरील अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी, इतिहास वाचा, संदर्भ तपासा, आणि आपण कोणाचे वंशज आहोत याची जाणीव ठेवा.

शाहू महाराजांची घसरगुंडी ही कुठलीही लपवून ठेवलेली गोष्ट नव्हती. ती त्यांनी व्यायामासाठी जाणीवपूर्वक उभारलेली एक रचना होती. मात्र त्यांच्या प्रगतीशील आणि क्रांतिकारी कार्यामुळे अस्वस्थ झालेल्यांनी तीचा वापर करून शाहू महाराजांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

आपल्याला शाहू महाराजांचा वारसा जपायचा असेल, तर हे विनोद हसून नाकारू नका. सत्य मांडण्यासाठी सज्ज व्हा. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांच्यावर लावलेल्या प्रत्येक खोट्या आरोपाचं खंडन, हीच खरी शाहू महाराजांना अभिव्यक्त श्रद्धांजली ठरेल.


🔗 महत्वाचे संदर्भ:

  • ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ – जयसिंगराव पवार
  • ‘शाहू महाराज स्मृतीदर्शन’ – हिंदूराव साळुंखे
  • ‘Shahu Chhatrapati: A Royal Revolutionary’ – Dhananjay Keer
  • ‘राजर्षी शाहू: राजा व माणूस’ – कृ.गो. सूर्यवंशी
  • ‘शाहू छत्रपती आणि लोकमान्य’ – य.दि. फडके

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker